महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

पंतप्रधान आवास योजनेत धाराशिव जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल

 

 

धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) ;-
पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) आणि इतर घरकुल योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस डी.आर.डी.ए.चे प्रकल्प संचालक श्री. अनुप शेंगुलवार, समाज कल्याण अधिकारी श्री. सचिन कवले, जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन श्री. त्र्यंबक ढेंगळे पाटील तसेच सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १२,८०९ लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹१,६०,००० अनुदान देऊन घरकुले मंजूर करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात २०२४-२५ पासून लाभार्थ्यांना ₹२,१०,००० पर्यंत वाढीव अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ७०,४४१ आणि शहरी भागातील ५००० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना’ अंतर्गत मिळणारे अनुदान देखील ₹५०,००० वरून वाढवून ₹१,००,००० करण्यात आले आहे. याशिवाय, घरकुल बांधकामासाठी लागणारी वाळू फक्त वाहतूक खर्चावर ५ ब्रासपर्यंत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या योजनांतर्गत पुढील टप्प्यात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अतिरिक्त रक्कम देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

या सर्व निर्णयांमुळे जिल्ह्यातील गरीब, भूमिहीन व घर नसलेल्या कुटुंबांना थेट लाभ मिळून त्यांचे वास्तवात परिवर्तन होईल, अशी अपेक्षा आहे.

गावठाणास लागून असलेल्या २०० मीटरपर्यंतच्या गायरान जमिनीत अधिकृत ले-आऊट करून योजनेंतर्गत घरकुल मंजुरी दिली जाणार आहे. या विषयावर ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. एकनाथ डवले यांच्याशी आपण चर्चा केली असून, अशा प्रकरणांचे प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!