आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्य कामगार विमा योजनेचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा ; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

दर्पण न्यूज पुणे : राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री #प्रकाशआबिटकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य कामगार विमा महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुकांतचंद्र दास, कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बाळकृष्ण रंगदळ, बिबवेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकक्षक डॉ. अभिमन्यू पांडा आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, या योजनेत कामगारांची नोदणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तळेगाव, रांजणगाव, चाकण, इ. कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे. एमआयडीसी मधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन करावे व यामाध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य कामगार विमा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उद्दीष्ट निश्चित करुन जास्तीत जास्त कामगारांपर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करुन पुणे जिल्ह्यातील २१ कामगार सेवा दवाखान्यात नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, बिबवेवाडीच्या कामगार रुग्णालयाचे काम उत्तमप्रकारे सुरू असून त्याठिकाणी दुय्यम आरोग्यसेवा चांगल्याप्रकारे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणेच पुणे जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करावा. तसेच पुणे जिल्ह्यातील कामगारांसंबंधित सर्व आस्थापनांनी समन्वय साधून विमा कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुन एक महिन्यात उद्दीष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली व या योजनेत विमा रुग्णांच्या उपचारासाठी कोणतीही उच्चतम मर्यादा नसल्याने सर्वात चांगली योजना असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!