पुणदी च्या तरुणाचा डेंग्यू ने मृत्यू
आरोग्य यंत्रणे ने कारवाई करावी: पुणदी च्या नागरिकांची मागणी

पलूस:-
पलूस तालुक्यातील पुणदी येथील तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला.
आमिर तांबोळी वय 32 वर्षे , असे डेंग्यूने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणदी गावासह संपूर्ण पलूस तालुक्यामध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे .पलूस तालुक्याची आरोग्य यंत्रणा निद्रावस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी बातमी दिल्यानंतरच ही आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होते. तोवर अगदी निवांत पणे त्यांचे कामकाज चालू असते. आरोग्य यंत्रणेचे गंभीर चित्र पलुस तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे. . एकंदरीत आरोग्य यंत्रणेची दैना उडाली असल्याचे चित्र आहे. पुणदी सह संपूर्ण पलूस तालुक्यामध्ये डेंगू सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्ण डेंगूने ग्रासले आहेत. पुणदी येथील 32 वर्षे वयाच्या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला ही अत्यंत गंभीर बाब आहे .अनेक रुग्ण पलूस तालुक्यामध्ये डेंगू ने त्रस्त आहेत ,आरोग्य यंत्रणेने त्वरित कारवाई करून परिसरातील डेंगूसदृश्य स्थिती आटोक्यात आणावी, त्यावर उपाय योजना राबवण्यात यावी अशी मागणी पुणदी गावातील जहांगीर तांबोळी,
निलेश पाटील,दीपक पाटील, भरत पाटील, अमन मुलाणी,मंगेश पाटील,मनोज पाटील,अक्षय कोळी, या तरुणांनी केली आहे .अवघ्या दोन-चार दिवसच अमीर तांबोळी याला ताप आला होता. त्यावर त्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते .थोडा उपचार केल्यानंतर बरे वाटेल असे वाटत असतानाच आणखी अशक्तपणा जाणवला. त्याला उपचारासाठी पलूस येथे नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे नमन शहा यांच्या हॉस्पिटल ला नेण्यात आले. प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याची तब्येत खालावली होती. अचानक तरुणाची स्थिती बिघडल्याने त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांना धक्का बसला होता. सुशिक्षित कुटुंबातील असणारा अमीर तांबोळी चा सर्व मित्रांसोबत मनमिळावू स्वभाव होता. त्याचा एका मित्रासोबत गावामध्ये बझारचा व्यवसाय होता. त्याची आई हसीना तांबोळी या पुणदी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून सेवेत आहेत. आणि वडील सिकंदर तांबोळी हे हुतात्मा सहकारी साखर कारखाना येथे सेवेत आहेत. पुणदी चे तांबोळी कुटुंब हे सर्वांशीच मिळून मिसळून राहणारे आणि सर्वांसोबतच खेळीमळीने वावरणारे हे कुटुंब या कुटुंबामध्ये त्यांच्या एकुलता एक असणाऱ्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक,गावातील नागरिक , बंधू भगिनी यांनी एकच गर्दी केली होती. अमीर तांबोळीच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,दोन मुली असा परिवार आहे . जियारतविधी रविवारी सकाळी दहा वाजता पुणदी येथे होणार आहे. पलूस तालुका हा 35 गावांचा तालुका असून , पलूस येथे एक ग्रामीण रुग्णालय आणि कुंडल आणि भिलवडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी चार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु याकडे आरोग्य यंत्रणा, प्रशासन ,लोकप्रतिनिधी ढुंकूनही पहात नाही. उपकेंद्रामधून डॉक्टरांची अनुपस्थिती ,अपुरा औषध साठा यामुळे नागरिक ,सरकारी यंत्रणेवरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. म्हणून नागरिक खाजगी दवाखान्याकडे वळतात, परंतु तेथेही रुग्णांच्याकडून वारेमाप पैसे उकळले जात असल्याचे चित्र आहे .प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील औषध साठा तसेच त्यांच्याकडून होणारा सर्वे ,तेथे असणारी डॉक्टरांची उपलब्धता ही परिपूर्ण असावी अशी मागणी करण्यात येत आहे .एकंदरीत पलूस तालुक्यामध्ये डेंगूसदृश्य परिस्थिती भयंकर झाली आहे . प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य यंत्रणेला कामाला लावणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी ही स्थिती गांभीर्याने हाताळावी अशी मागणी होत आहे.