शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल

दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धनाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि विभागाने विस्तार कार्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावाख् असे आवाहन त्यांनी केले.
कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ. सुनिल महाजन यांनी सद्याची पिक परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पीक स्पर्धा पुरस्कार विजेता शेतकऱ्यांपैकी योगेश यशवंत कांबळे, खंडेराजुरी आणि विकास लक्ष्मण पाटील, कर्नाळ या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले आणि त्यांनी वापरलेल्या पीक उत्पादनाच्या आधुनिक उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
सांगली जिल्ह्यातील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मिरज तालुक्यातील तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने आणि कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले यांनी केले. मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर यांनी आभार मानले.