आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने स्थानिक यंत्रणा कार्यान्वित कराव्यात : जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज सांगली : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तालुका स्तरावरील यंत्रणा कार्यान्वित कराव्यात. स्थानिक स्तरावर काम करण्यायोग्य व्यावहारिक ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरीक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
सांगली… मी सुरक्षित ठेवणारच! हे घोषवाक्य ठरवून व तसे ध्येय ठेवून प्रत्येक यंत्रणेने दिलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत विविध कलमे व त्यानुसार करावयाची कार्यवाही याबाबत सूचना दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन ही नियोजन, आयोजन, समन्वय आणि अंमलबजावणी यांच्या माध्यमातून सतत चालणारी आणि एकत्रित प्रक्रिया असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कोणत्याही आपत्तीचा धोका किंवा संकट टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आखणे गरजेचे आहे. जिल्हास्तरावरील शासकीय विभागांनी व स्थानिक प्राधिकरणांनी आपत्ती टाळण्यासाठी व तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात. तात्काळ प्रतिसाद यंत्रणा व संवाद यंत्रणा प्रस्थापित करावी. कोणतीही चुकीची, खोटी माहिती किंवा अफवा पसरली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नाले सफाई, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, निवारा केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. धोक्याची सूचना देणारी यंत्रणा उभी करावी. संबंधित सर्व यंत्रणांचे नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवावेत. संभाव्य आपत्ती परिस्थितीत जीवित व वित्त हानी होऊ नये, यासाठी नागरिकांना विश्वासात घ्यावे. याआधीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन संभाव्य पूरबाधित गावात मॉक ड्रिल्स घ्यावेत, असे ते म्हणाले.
आपत्कालिन स्थितीत सर्व यंत्रणांनी अंतर्गत व परस्पर समन्वय ठेवावा, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, संभाव्य आपत्ती परिस्थितीत प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. पूरबाधित गावे ओळखून आगाऊ उपाययोजना कराव्यात. पर्यटक धोकादायक ठिकाणी जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सर्वांनी पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामग्रीसह सज्ज राहावे. संभाव्य पूरबाधित गावांची पाहणी करावी. रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत. रस्त्यांच्या अपूर्ण कामांच्या ठिकाणी, वळणाच्या ठिकाणी, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, आपत्कालिन कक्ष, विविध आपत्कालिन संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रूग्णवाहिका, मदत केंद्रे यासारख्या बाबींचा आराखडा तयार ठेवावा. ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती, आणि पूर्वसूचना गट तयार करावेत, असे सूचित करण्यात आले.
00000