महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात पशुगणनेस सुरुवात; अचूक माहिती देण्याचे आवाहन

 

सांगली  : केंद्र पुरस्कृत २१ वी पंचवार्षिक पशुगणना २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती पशुप्रगणकांना द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात म्हटले आहे, पशुसंवर्धन विभागामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. यामध्ये प्रामुख्याने गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, बदक, टर्की, हत्ती, ससे, डुक्करे, उंट, घोडा, गाढव, कुत्रा इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. यामध्ये पशुधनाच्या संख्येची नोंद मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ॲपची निर्मिती केलेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुगणनेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे.

या पशुगणनेसाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची नेमणूक करीत असताना ग्रामीण भागासाठी 3000 कुटुंबासाठी एक प्रगणक व पाच प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक आणि शहरी भागासाठी 4000 कुटुंबासाठी एक प्रगणक व दहा प्रगणकामागे एक पर्यवेक्षक अशी नेमणूक केली जाते. जिल्ह्यात पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागासाठी 155 प्रगणक व 24 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. तसेच शहरी भागासाठी 47 प्रगणक व 12 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पशुगणना मोबाईल ॲपद्वारे करण्यात येत असून तीन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे.  सदर 21 व्या पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची प्राधान्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व सर्वांना सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले आहे.राज्याच्यापशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात व त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाते. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार रोगप्रतिबंधक लसीकरणासाठी लसमात्रा व उपचारासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी पशुगणना अत्यंत महत्वाची आहे, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!