बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा ; सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

दर्पण न्यूज सांगली : बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मधील तरतूदीनुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यवसायामध्ये अथवा प्रतिबंधित उद्योग प्रक्रियेमध्ये 14 ते 18 वयोगटातील मुले कामावर ठेवल्याचे निदर्शनास किंवा आढळल्यास तात्काळ सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली. दुरध्वनी क्रमांक 0233-2950119 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
बाल कामगार प्रथेविरोधी दिनांक 12 जून या दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मालकाने / नियोक्त्याने 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रूपये इतका दंड किंवा सहा महिने ते दोन वर्ष कारावास होवू शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होवू शकते. याची जिल्ह्यातील सर्व आस्थापना / दुकाने /कारखाने व अन्य व्यवसायिक याची नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. मुजावर यांनी केले आहे.