भिलवडी येथील सिद्धविनायक नाष्टा सेंटरचे मालक अनिल उर्फ पिनू खराडे यांचा प्रामाणिकपणा ; अनेकांकडून कौतुक
७० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आटपाडीचे मूळ मालकांना केला परत ; भिलवडी व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टीमचा अनेकांना फायदा

दर्पण न्यूज भिलवडी :-: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सिद्धविनायक नाष्टा सेंटरचे मालक अनिल उर्फ पिनू खराडे यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा दाखवून दिला असून, आपल्या नाष्टा सेंटर गाड्यावर ग्राहकाचा विसरलेला तब्बल ७० हजार रुपये किंमतीचा मोबाईल प्रामाणिकपणे परत दिला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने भजी व वडापाव विकून उदरनिर्वाह करणारे सिद्धविनायक नाष्टा सेंटरचे मालक अनिल उर्फ पिनू खराडे हे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मोफत वडापाव वाटपाचे देखील कार्य करीत असतात.आजपर्यंत त्यांनी आपल्या गाड्यावर विसरलेल्या ग्राहकांच्या वस्तू प्रामाणिकपणे परत केल्या आहेत. भिलवडी येथे रविवारी आठवडी बाजार असल्याने बाजारपेठेसह नाष्टा सेंटर गाड्यावर ग्राहकांची मोठी गर्दी होती. अशावेळी आटपाडी येथील एक दाम्पत्य नाष्टा करण्यासाठी पिनू खराडे यांच्या नाष्टा सेंटरवर आले. त्यांनी नाष्टा केल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी पुढील प्रवास सुरू केला. त्याचवेळी आपल्या नाष्टा सेंटरवर या दाम्पत्याचा अॅपल कंपनीचा अंदाजे 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल विसरल्याचे
पिनू खराडे यांच्या लक्षात आले. परंतु संबंधित ग्राहकाची कोणतीही माहिती नसल्याने खराडे यांनी भिलवडी बाजार पेठेतील व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरून संबंधित मोबाईलबाबत माहिती दिली.
तोपर्यंत आटपाडी कडे निघालेल्या दाम्पत्याच्या आपला मोबाईल हरवल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी पुन्हा भिलवडीकडे येत पिनू खराडे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर पिनू खराडे यांनी सदरचा मोबाईल मिळून आल्याचे सांगितले. त्यानंतर कोणतीही अपेक्षा न ठेवता पिनू खराडे यांनी सदर मोबाईल संबंधित दाम्पत्यास परत केला. भिलवडी येथील व्यापाऱ्यांची प्रामाणिक व्यवसायाची परंपरा अखंडपणे असून, पिनू खराडे यांच्या या कार्याचे भिलवडी आणि परिसरातून कौतुक होत आहे.