आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कसबा बावङा येथील सेवा रुग्णालयाच्या नियोजित विस्तारीकरणासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करू : आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

 

कोल्हापूरः अनिल पाटील

कसबा बावडा लाईन बझार परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर कसबा बावडा ते शिये ग्रामीण भागापर्यंत सुमारे १ लाख नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णसेवेसाठी हे रुग्णालय सुसज्ज व्हावे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात. दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा याठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून, महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेले सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबीटकर यांच्यासमवेत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून, नियोजित विभागांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या कामकाजाचा, समस्यांचा आणि रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सेवा रुग्णालयास भेट दिली. याप्रसंगी आयोजित बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत रुग्णसेवेत सुधारणा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीच्या सुरवातीस उपसंचालक डॉ.दिलीप माने यांनी, नियोजित महिला, सिव्हील व क्रिटीकल केअर युनिट विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक असून, बफर झोन असल्यामुळे सदर परवानगी मिळत नाही. याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. हे विभाग सेवा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यास सद्यस्थितीत ५० खाटांचे असणारे रुग्णालयाची खाटांची संख्या वाढवून सुमारे २५० इतकी करता येईल. यामध्ये महिला विभागासाठी १०० खाट, सिव्हील विभागासाठी ५० खाट आणि क्रिटीकल केअर युनिट विभागाचे ५० खाटांची क्षमता असणाऱ्या इमारती प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.

याबाबत महानगरपालिका अधिकारी एन.एस.पाटील यांनी माहिती देताना, लाईन बझार परिसरात असणाऱ्या झूम प्रकल्पाच्या आसपास असणाऱ्या ५०० मीटर अंतरापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बफर झोनची निर्मिती केली असून, या झोनमध्ये नवीन इमारत बांधकामास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सदर प्रस्तावित विभागांच्या इमारतींसाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगितले.

यावर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, रुग्णालय हि अत्यावश्यक सेवा आहे. होणाऱ्या इमारतीचा वापर आरोग्य सेवेसाठी होणार आहे. सदर इमारतींचे बांधकाम बफर झोनच्या शेवटच्या टोकाला होणार असून, याकरिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अटी शिथिल करून विशेष बाब म्हणून परवानगी घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करू अशी माहिती दिली. यासह रुग्णालय सुसज्ज करण्याच्या दृष्टीने आवश्यक मशिनरी, मनुष्यबळ यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. सदर रूग्णालयामार्फत आरोग्य सेवा वाढविण्याची संधी असून, नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. आरोग्य सेवेत सुधारणा करा. नागरिकांना २४ तास चांगली आरोग्य सेवा द्या, अशा सूचना रुग्णालय प्रशासनास केल्या.

या बैठकीस उपसंचालक कोल्हापूर मंडळ डॉ दिलीप माने, जिल्हा शल्चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक सेवा रुग्णालय डॉ नीलिमा पाटील, कोल्हापूर महानगरपालिका उप आयुक्त पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. पावरा, सहाय्यक अधीक्षक आयुब मुल्ला, वरिष्ठ लिपिक अजित कोळी, शिवसेना महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहर समन्वयक सुनील जाधव, कृष्णा लोंढे, रोहन उलपे, दादासो आळवेकर, रोहित चव्हाण, जय लाड, सचिन पाटील, आदर्श जाधव, सुरज सुतार, आकाश चौगुले, प्रणव इंगवले, किरण सुतार, प्रज्वल चव्हाण आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!