ग्रामीणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद

 

    दर्पण न्यूज मिरज / सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून या योजनांचा लाभ त्यांना द्यावा. या अभियानाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत राज संस्था सुशासन, लोकसहभाग व शाश्वत विकासाचे आदर्श केंद्र बनेल यासाठी व गावे समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल इनाम धामणी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना सूत्रबध्दतेने काम करण्याची संधी मिळेल. या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन ती आपल्या गावातील तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा नीट अभ्यास करून, त्यांची गावामध्ये अंमलबजावणी करावी. शहरामध्ये असणाऱ्या विविध सोयी सुविधा गावातच मिळाल्या तर ग्रामीण नागरिकांना अधिक चांगले जीवन जगता येईल व लोक शहराकडे वळणार नाहीत. यासाठी गावे समृध्द करावीत. ग्रामपंचातींना थेट निधी दिला जात आहे. या माध्यमातून चांगली कामे करून गावे मजबूत करावीत. विविध प्रयोग करून पुढे जावे. महिला सक्षम होण्यासाठी मुलींना चांगले शिक्षण द्यावे. गावातच रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी करून उत्पन्न वाढीसाठी त्यांनी स्वतः गावी केलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली.

यावेळी खासदार विशाल पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहोचवून गावांचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी कार्यशाळेचा हेतू विषद करून आदर्श गाव, तालुका, जिल्हा, राज्य घडविण्यासाठी शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!