संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने योग्य नियोजन करून सज्ज राहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

दर्पण न्यूज सांगली : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी 2019 च्या पुराचा अनुभव व त्यावेळीची पाणीपातळी याचा अभ्यास करून योग्य नियोजन करावे व पूरपरिस्थिती उदभवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात नाले सफाई योग्यरित्या होईल व त्यातील गाळ विहीत वेळेत उचलला जाईल याची दक्षता घ्यावी. प्रसंगी नालेसफाई योग्यरित्या झाली आहे का हे पाहण्यासाठी स्वत: येऊ असे ते म्हणाले. आवश्यक बोटी उपलब्ध करून घेऊन त्या सुस्थितीत ठेवाव्यात. पूरस्थिती उदभवल्यास नागरिक व जनावरे यांचे स्थलांतर योग्य ठिकाणी करण्यासाठी व त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, आपदा मित्राची संख्या वाढवावी, त्यासाठी एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाणी टंचाईच्या ठिकाणी आवश्यक टँकर द्यावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व विभागांची आढावा बैठक घेतली असल्याचे सांगून संबंधित विभागांना त्यांचे आराखडे तयार ठेवण्याबाबत व अचूक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात असल्याचे सांगून सविस्तर सादरीकरण केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर व महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.