क्राईममहाराष्ट्र

दूध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट :- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

       दर्पण न्यूज सांगली : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने दुध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत 5 टॅंकरमधील एकूण 75 हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या कारवाईत गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

            सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पवार व श्री. स्वामी, नमुना सहाय्यक श्री. कवळे व श्री. कसबेकर यांनी नागज फाटा येथे थांबून तेथून जाणाऱ्या 05दुध वाहतुक वाहनांची तपासणी केली. या टॅंकरमधील दुधाची इन्स्टंट स्ट्रीपच्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली.  कोल्हापूर जिल्हा सह. दुध उत्पादक संघ (गोकुळ ) व वारणा  डेअरी, कोल्हापूर येथे जाणाऱ्या टॅंकरमधील दुधाचे 3 नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. टॅंकर क्र. एम एच 09 जी आर 5567 मधील गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये मीठाची भेसळ आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पवार यांनी या टॅंकरमधून दोन कप्प्यामधून गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणाकरीता घेऊन गाय दुधाचा 10 लाख 63 हजार 860 रूपये किंमतीचा 30 हजार 396 लिटर गाय दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला.  या गाय दुधाचा टॅंकर घेरडी तालुका सांगोला येथील एल के पी दुध शितकरन केंद्र येथून गाय दुध घेवून हामीदवाडा ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथील दत्त इंडीया प्रा. लि. या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

            नागरीकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करुन किंवा ई मेल आयडी fdasangli@gmail.com यावर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न ) श्री. मसारे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!