सावर्डे बुद्रुक येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात ; दिग्गजांची उपस्थिती
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण ; लोकांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे धम्मपालन बुद्धविहारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या हे होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक धर्मा तुकाराम कांबळे होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा आणि शहाणे व्हा, हा मंत्र दिला. परंतु; आम्हाला आपला शत्रूच कळाला नसल्यामुळे आम्ही आपआपसातच संघर्ष करत राहिलो. ज्या रुढी-परंपरानी आम्हाला वाळीत टाकलं, त्याविरोधात संघर्ष केला पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीचे भान ठेवून त्यांना डोक्यावर नको, डोक्यात घेऊया.
निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करूया. पुरोगामी विचार आणि सर्वधर्मियांचे नेतृत्व असलेले मंत्री हसन मुश्रीफ हे डॉ. बाबासाहेब यांचे पाईक आणि अनुयायी आहेत, असेही ते म्हणाले.
मंत्री श्री. मुश्री म्हणाले, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट राज्यघटना आहे. अमेरिकेसारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातसुद्धा अध्यक्ष बदलानंतर हिंसाचार होतात. परंतु; भारतात मात्र कोणताही हिंसाचार न होता एखादीही गोळी न उडता सत्ता बदलानंतर नवीन सत्ता स्थापन होत असते. ही डाॅ. बाबासाहेबांची फार मोठी देणगी या देशाला मिळालेली आहे.
कार्यक्रमात गावातील विविध विभागात यश मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी, सरपंच सौ. शितल हिरूगडे, उपसरपंच विनोद कांबळे, दलितमित्र बळवंतराव माने- एकोंडीकर यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे,पांडुरंग हिरूगडे, सरपंच सौ. शितल हिरूगडे, भिमशक्तीचे अध्यक्ष नंदकुमार विधाते, पोलीस पाटील राजेंद्र कुंभार, प्रा. तानाजीराव पाटील, डॉ. संजय चिंदगे, डॉ. इंद्रजीत पाटील, शंकर जाधव, सौ. प्रभाताई पाटील, राजू इनामदार, शशिकांत म्हातुगडे, दत्ता कांबळे, रफीक ईनामदार, राजेंद्र कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते.