अंकलखोप येथे मगरीच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू
कृष्णा नदीच्या काठावर भीतीचे वातावरण ; उपाययोजनेची लोकांतून मागणी

दर्पण न्यूज भिलवडी- अंकलखोप :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील युवक अजित अनिल गायकवाड ( वय – ३२) यांचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
याबाबत वन अधिकारी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजित अनिल गायकवाड हा मंगळवार दि. १ -४- २०२५ रोजी कृष्णा नदीवर दुपारी १ वा पोहण्यासाठी गेला होता. दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात शोधा शोध सुरू केली. मात्र तो सापडला नाही. सकाळी बुधवार दि. २ -४- २०२५ रोजी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदी काठावर कपडे व चप्पल आढळून आले. यानंतर नागरिकांनी कपडे नदी काठावर असल्याची सूचना अजितच्या घरच्यांना दिली. त्यानंतर संबंधीत कपडे व चप्पल अजितचे असल्याचे घरच्यांनी ओळखले.
अजित चा चुलत भाऊ अविनाश बाळासो गायकवाड यांनी अजित हरविला असल्याची तक्रार मंगळवार दि. २ -४-२०२५ रोजी सकाळी भिलवडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर भिलवडी पोलिस व वन विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यांनी नावाडी नितीन गुरव यांच्या मदतीने नदी पात्रात बोटीतून शोधा शोधा सुरू केली. दुपारी सव्वाचारच्या सुमारस भिलवडी येथील हाळभाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तंरंगताना आढळला. तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता डाव्या हाताचा दंडाचा काही भाग व चेह-याचा निम्मा भाग मगरीने खाल्लेले आढळले. यानंतर अजितच्या मृतदेहाचे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यावेळी मगरीच्या हल्ल्यात मयत अजितच्या कुटूंबीयांना मदतीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही वन क्षेत्रपाल संतोष शिरसाटवार यांनी दिली.
यावेळी वनपाल सुजित गवते, वनपाल कडेगांव – पलुस सुरेखा लोहार, सपोनि के. बी. हारूगडे व पोहेकॉ सुनिल सुर्यवंशी, स्वप्नील शिंदे, यांच्या सह ४ होमगार्ड यांनी शोधकामात मदत केली.
या घटनेमुळे कृष्णा नदीच्या काठावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर संबंधितांनी उपाययोजना करावी, अशी मागणी लोकांतून केली जात आहे.
अजित हा औदुंबर ट्रस्ट येथे सफाई कामगार म्हणून काम करत होता त्याची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्याला शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी ही लोकातून होत आहे.