नेर्ली येथे कृषीकन्या साधणार शेतकऱ्यांशी संवाद ; नेर्लीत स्वागत : शेतकऱ्यांना उपाययोजनांबद्दल करणार मार्गदर्शन

नेर्ली :- नेर्ली ता. कडेगाव येथे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बु|| येथील कृषीकन्या दाखल झाल्या आहेत. या कृषिकन्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत ,तसेच उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
नेर्ली येथे कृष्णा कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या दाखल झाल्या आहेत. चतुर्थ वर्षाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव हा चार महिने कालावधीचा कार्यक्रम ग्रामीण भागात वास्तव्य करून पार पाडावयाचा असतो. यासाठी कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगन्य तसेच सोयी सुविधांच्या दृष्टीकोनातून परिपूर्ण असलेल्या कृषीकन्यांनी नेर्ली या गावाची निवड केली. संरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील व ग्रामस्थांनी कृषीकन्यांचे स्वागत केले. कृषीकन्या श्रध्दा किर्वे, निकिता काटकर ,दिव्या कुदळे, आरती जाधव, कृतिका बेडसे, श्रुतिका भाले, अश्विनी कणसे या शेतातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देणे, आधुनिक शेतीची प्रात्यक्षिके करून दाखविणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे तथा कार्यक्रम, उपक्रम आयोजित करणे आदी कामे करणार आहेत.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. दिपक भिलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण पाटील व विषय तज्ज्ञ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या काम करणार आहेत. शेतकऱ्यांनी या कृषी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिकन्या आणि महाविदयालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.