महाराष्ट्र

आरसेटीच्या प्रशिक्षणातून मिळाली आयुष्याला कलाटणी

 

 

            महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान सांगली यांच्याकडून विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन अनेक महिला उद्योजिका बनल्या असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. याच प्रशिक्षण संस्थेतून तासगाव तालुक्यातील लोढे गावच्या मयुरी अभिजीत गायकवाड यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

 

            मयुरी गायकवाड यांचे शिक्षण दहावी झाले आहे. घरी सासू सासरे, पती आणि दोन लहान मुलं. पती अभिजीत गायकवाड यांचा केशकर्तनाचा व्यवसाय आहे. मात्र, मोठं कुटुंब असल्याने चरितार्थ चालवताना आर्थिक चणचण भासत होती. ही आर्थिक अडचण पतींच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. याचवेळी आरसेटीच्या वतीने त्यांच्या लोढे गावात आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली व आरसेटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत प्रशिक्षणाची माहिती घेतली. व हे प्रशिक्षण घेऊन आपलाही छोटेखानी व्यवसाय सुरू करून, उदरनिर्वाहासाठी हातभार लावण्याचा विचार त्यांनी कुटुंबियांसमोर मांडला. त्याला घरच्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मयुरी यांनी ताबडतोब आरसेटी सांगली येथे संपर्क साधून ब्युटी पार्लर मॅनेजमेंट या 30 दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली व ते प्रशिक्षण पूर्ण केले.

 

            या प्रशिक्षणात मयुरी गायकवाड यांना प्रशिक्षिका कृष्णाली शिवशरण यांनी फेशिअल, मसाजचे प्रकार, मेकअप आर्टिस्ट, हेअर कट, तसेच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण दिले. यामध्ये कोणत्या स्किन वर कोणता प्रॉडक्ट कसा वापरायचा, कोणत्या मशिनरी वापराव्या, अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, सांगली मार्फत देण्यात आले. याचबरोबर आरसेटीचे  प्रशिक्षक प्रदीप साळुंखे आणि प्रवीण पाटील यांनी व्यवसायाचे बँकिंग, आर्थिक नियोजन कसे करावे, व्यवसाय कसा वाढवावा, स्टॉक मेंटेनन्स कसे करावे, प्रॉडक्ट मार्केटिंग, आलेल्या अडचणींवर मात कशी करावी याची माहिती दिली. संभाषण कौशल्याचेही धडे दिले. यामुळे मयुरी गायकवाड यांच्या विचारांना दिशा मिळाली.

 

            प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक गणित जुळवायचे होते. त्यासाठी बँकिंग सत्राच्या प्रशिक्षणादरम्यान मुद्रा कर्जाविषयी त्यांनी माहिती घेतली. संस्थेचे संचालक महेश पाटील यांच्या मदतीने मुद्रा कर्जासाठी अर्ज केला. बँक ऑफ इंडिया तासगाव शाखेचा पाठपुरावा केल्यावर त्यांना 50 हजार रूपये चे कर्ज मिळाले आणि त्यांच्या स्वतःच्या निधीतून 30 हजार रूपये जोडून सहा महिन्यांपूर्वी मयुरी गायकवाड यांनी ब्युटी पार्लरचा स्वतःचा उपक्रम सुरु केला.

 

याबाबत मयुरी गायकवाड म्हणाल्या, प्रशिक्षणात जे काही शिकले त्याचा मला उत्तमरीत्या फायदा होत आहे. या सर्व गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून आज मी एक यशस्वी उद्योजिका म्हणून उभी आहे. या माध्यमातून 20 हजार रूपयांच्या आसपास कमाई होत आहे. प्रशिक्षणानंतर आर्थिक परिस्थितीत चांगला बदल झाला असल्याचे सांगून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांनी, तरूण पिढीने आरसेटीमध्ये जावून प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आयुष्याला चांगली कलाटणी देणाऱ्या आरसेटीचे त्यांनी आभार मानले आहेत.

 

(शब्दांकन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!