पलूस येथील जवाहर विद्यालयात प्रा.सर्जेराव खरात यांच्या कथाकथनाने रसिक मंत्रमुग्ध

दर्पण न्यूज पलूस :-
जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे कथाकथनकार सर्जेराव खरात यांचा मराठी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे प्रा.सर्जेराव खरात यांचे स्वागत केले. यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या शब्दकोड्यांच्या स्पर्धेतील विजेत्या गटाने आपले सृजनशील शब्दकोडे प्रमुख पाहुण्यांना दाखवले. या गटाला प्राचार्य सरांच्या हस्ते प्रोत्साहन पर लेखण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यानंतर प्रा. खरात यांच्या कथाकथनाला सुरुवात झाली. बोलके हावभाव, ओघवती शैली, आवाजातील चढ उतार आणि अस्सल मराठी ग्रामीण बाज अशा दिमाखदार प्रस्तुतीने अवघ्या श्रोतृवृंदास पुढील 50 मिनिटांपर्यंत सर्जेराव खरात यांनी खिळवून ठेवण्याचे काम केले. कधी पोटभर हसवले तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या तर कधी सर्वांना विचारप्रवण करून सोडले. प्रा.सर्जेराव खरात यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने सर्वांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडले. कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज केली . राजस्थानहून आलेल्या स्थानांतरित विद्यार्थ्यांशी त्यांनी मराठीमध्ये संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार एस एच कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास मराठी विषय शिक्षक व्ही के पाटील शबाना मुल्ला, संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि कलाशिक्षक राहूल पवार यांचे सहकार्य लाभले.