क्राईममहाराष्ट्र

पोलिस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठकीत घेतला आढावा

 

 

 

सांगली – : दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अमली पदार्थ तस्करांना जरब बसवण्यात अमली पदार्थ टास्क फोर्सची यशस्वी वाटचाल सुरू असून, पुढील टप्प्यात पोलीस विभागाने महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडिओ पार्लर व कॅसिनोंची तपासणी करण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.अमली पदार्थ तस्करीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या धाडी सुरू आहेत. या कार्यवाहीचा नियमित आढावा घेतला जात आहे. तसेच, प्रशासनाच्या आवाहनानंतर गोपनीय खबरांचे प्रमाण वाढले आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 16 ते 26 मार्च या 10 दिवसात 4 गुन्हे दाखल झाले. सात आरोपींना अटक झाली. 9 लाख 17 हजार 220 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये नशेची इंजेक्शन्स, गांजा, भांगेच्या गोळ्या अशा विविध प्रकारच्या मुद्देमालाचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यात पोलीस विभागाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोची तपासणी करावी. परवानाधारक व्हिडिओ पार्लर व कॅसिनो चालकांकडून अवैध धंदे होत नसल्याचे व ज्यासाठी परवाना घेतला आहे, तीच बाब सुरू असल्याचे  शपथपत्र महसूल प्रशासनाने घ्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.पोलिस विभागाची सतर्कता आणि प्रबोधन या माध्यमातून जिल्ह्यातून अमली पदार्थ व अमली पदार्थ तस्करांना हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवून यापुढेही संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अमली पदार्थविरोधी देखावा स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफीत, जिंगल्सच्या स्पर्धेला प्रतिसाद मिळत असून, त्याची 31 मार्च अंतिम मुदत आहे. एप्रिलमध्ये प्रवेशिकांची छाननी केली जाईल व 1 मे रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल. शाळा, महाविद्यालये, आय. टी. आय., अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा जनप्रबोधनात्मक लघुपटांचा जास्तीत जास्त प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्राथमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आदिंमध्ये करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरात तंबाखूमुक्त शाळा अभियान 100 टक्के यशस्वी केले आहे. यात भर घालून आता शाळा परिसरात अमली पदार्थ विरोधी अभियान सुरू करावे. सर्व शाळा परिसरात अमली पदार्थ विक्री होत नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन, ही मोहीमही यशस्वी करावी. शालेय स्तरावरच अमली पदार्थविरोधी प्रबोधन केले तर भावी पिढीसाठी तो एक संस्कार होऊन त्याच्या आयुष्याचा भाग बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी अमली पदार्थ प्रकरणी पोलीस दलाने केलेल्या आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. पोलीस दलाकडून अमली पदार्थसंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला. तर अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफीत, जिंगल्सच्या स्पर्धेसंदर्भातील कार्यवाहीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादर केली.

क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचाही घेतला आढावा

गुन्हे घडण्याची शक्यता असणारी ठिकाणे ओळखून, अशा ठिकाणी टप्प्याटप्प्याने पूर्ण धाक निर्माण करावा. सज्जन माणसाला अभय आणि दुर्जन माणसाला भीती असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.क्राईम टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात ही बैठक झाली.गुन्हे घडण्याची शक्यता असणाऱ्या, तसेच, अनधिकृत कामगिरी सुरू असणाऱ्या ठिकाणांची तपासणी  करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कौटुंबिक गुन्ह्यांमध्येही मागोवा घेऊन यशस्वी उकल करावी. जिल्ह्यातील 2 हजारहून अधिक परवानाधारक शस्त्रात्रांचा आढावा घेतानाच, संबंधितास शस्र बाळगण्याची गरज का आहे, याचे कारणही लेखी स्वरूपात घ्यावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस विभागाची कामगिरी, गुन्हेगारी घटनांचा आढावा सादर केला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!