महाराष्ट्र

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या विचाराने क्षीतिजा पलीकडेचे जग पहाणारी नवीन पिढी निर्माण करण्याची गरज ; पालकमंत्री,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

 

दर्पण न्यूज  वाळवा – :
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 13 वा स्मृतीदिनानिमित्त जाहिर सभा प्रमुख पाहुणे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब व माजी खासदार मा.संजय मंडलिक साहेब यांचे उपस्थित हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर पार पडली. जिजामाता विद्यालयाच्या व हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीच्या कला वैभव गीत मंचच्या स्वागत गिताने मान्यवराचे व उपस्थितांचे स्वागत केले.
आपल्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे चेअरमन मा.वैभवकाका नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णांचा दुष्काळी भागाला पाणी मिळाले पाहिजे असा आग्रह होता. पाण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला व तो यशस्वी केला. शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्तांना, धरणग्रस्तांना, कामगारांना, शेतमजूर, कष्टकऱ्यांना या सर्व घटकाना अण्णा आपले वाटत होते. अण्णांनी फुले-शाहू,आंबेडकर यांचा विचार शेवटपर्यंत जोपासला. स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतर अशा दोन खंडात अण्णांचे कार्य विभागले आहे ते आपण तरुण व येणाऱ्या पिढीला समजून सांगितले पाहिजे.
प्रमुख पाहुणे माजी खासदार मा.संजय मंडलिक म्हणाले, अण्णांना लहानपणापासून देशसेवेचे व्यसन लागले होते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये अण्णांचे योगदान फार मोठे आहे. अण्णांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानून सशस्त्र क्रांती केली. यासाठी गोव्याहून शस्त्रे आणली. चळवळीच्या आर्थिक अडचणीसाठी धुळे खजिना, शेणोली पे ट्रेन लुटली. अणांनी सामान्य माणूस शैक्षणिक व आर्थिक स्वावलंबी बनविला. अण्णा एखादया तपस्वीप्रमाणे जीवन जगले. अण्णांना आदर्श मानून हुतात्मा पॅटर्नप्रमाणे आम्ही कोल्हापूर जिल्हयात काम करीत आहोत.
यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.प्रकाश आबीटकर साहेब म्हणाले, वाळव्याची भूमी ही नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे. अण्णांनी स्वातंत्र्य लढयात व प्रती सरकारमध्ये योगदान देऊन जिवाची बाजी लावली. गंगापूरच्या महादेव सुतार या माहिती नसलेल्या शहिदाचा पुतळा अण्णांनी उभा केला. स्वातंत्र्यानंतर अण्णांनी लोक कल्याणाची चळवळ उभी केली. समाजकारणाची व राजकारणाची जोड घालून अण्णांना सर्वसामान्यांच्या पाठीशी राहिले. दुष्काळी भागाला पाणी देणेसाठी अण्णांनी चळवळ उभी करुन ती यशस्वी केली. या चळवळीसाठी वाळवा या क्रांती भूमीतून शेवटपर्यंत सर्वातोपरी मदत झाली. अण्णांनी प्रत्येक व्यक्तीचा आदर करुन त्याला प्रेम, जवळीक व माया दिली. हुतात्म्यांचे स्मारक म्हणून अण्णांनी शिक्षण व उद्योग समुह उभा केला. अण्णांची उर्जा घेवून पुढील पिढी तयार होणेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. अण्णांच्या शिस्तबध्द कार्याची मा.वैभवकाका नायकवडी यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत चांगले काम करीत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. घोषणा देणाऱ्या विद्यार्थी दशेपासून सामाजिक काम केल्यामुळे महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी काम करीत आहे. अण्णांच्या या स्मृतीदिन कार्यक्रमातून उदयाचा महाराष्ट्र घडविताना अण्णांच्या विचारांची उर्जा घेवून जात आहे. या कार्यक्रमात नागनाथअण्णांची नात व वैभवकाका यांची कन्या कु.मधुरा हिने एम.बी.बी.एस.ही पदवी मिळाल्याबद्दल तिचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमात युवा नेते मा.गौरवभाऊ नायकवडी, प्रा.बाळासाहेब नायकवडी,प्रा.आर.एस.चोपडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रा.राजा माळगी यांनी केले.
कार्यक्रमास प्रा.सुषमा नायकवडी,सौ.नंदिनी नायकवडी,विरधवल नायकवडी, केदारज्योती नायकवडी, कार्यकारी संचालक श्री.राम पाटील, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त,चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!