आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 128 बालकांची मोफत 2डी इ‍को तपासणी  

पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार

 

 

      दर्पण न्यूज     सांगली : सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2डी इको शिबीर घेण्यात आले. सिध्दीविनायक हॉस्पिटल, ठाणे येथील बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील 128 ह्रदयरोग संशयित बालकांची या शिबिरांतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. शिबीरात पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरुन अनुदान उपलब्ध करुन तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये  पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

            डीईआयसी इमारत सिव्हील हॉस्पिटल आवार, सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते. 

            या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाचे कौतुक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करुन घेतल्याबददल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले.

           शिबीरातील 128 लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च 4 लक्ष रूपये व अंदाजित 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित 3 लक्ष रूपये प्रमाणे एकूण खर्च 1 कोटी, याप्रमाणे एकत्रित एकूण 1 कोटी 4 लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे.

            राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1 हजार 850 लाभार्थ्यांच्या ह्रदय शस्त्रक्रिया व 28 हजार 500 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील अधिकारी व कर्मचारी हे गाव, वाडी, वस्ती, तळ इथपर्यंत पोहचून लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. तळागाळांतील गरजू लाभार्थींना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देत आहेत.

            या शिबिराकरिता यापुर्वी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेले लाभार्थी उपस्थित होते. यासाठी लाभार्थीनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करुन डॉ. कदम यांना कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

            जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!