दर्पण न्यूज सांगली : सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2डी इको शिबीर घेण्यात आले. सिध्दीविनायक हॉस्पिटल, ठाणे येथील बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील 128 ह्रदयरोग संशयित बालकांची या शिबिरांतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. शिबीरात पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरुन अनुदान उपलब्ध करुन तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. डीईआयसी इमारत सिव्हील हॉस्पिटल आवार, सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते. या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाचे कौतुक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करुन घेतल्याबददल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले....