दर्पण न्यूज मिरज/सांगली : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी 281-मिरज विधानसभा मतदारसंघात घेतला. यावेळी गणना फॉर्मच्या डिजिटलायझेशनचे काम आयोगाच्या सूचनांनुसार विहित वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गणना फॉर्मच्या डिजिटलायझेशनचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, बीएलओ पर्यवेक्षक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मिरज तहसील कार्यालयाला भेट देऊन गणना फॉर्मच्या डिजिटलायझेशन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देत, कामकाजात अचूकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर त्यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच मिरज येथील शास्त्री चौक परिसराला भेट देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) श्री. मकानदार यांच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी मतदार पडताळणी व गणना फॉर्मच्या डिजिटलायझेशनदरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेत, त्या तातडीने सोडविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मिरज तालुका उपनिबंधक कार्यालयास भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था बिपिन मोहिते, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसिलदार रंजना उंबरहांडे, अंनिस मुल्ला व सचिन सागांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती नीता शिंदे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती विजया यादव, तहसीलदार अपर्णा मोरे, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.