दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी शिराज शिकलगार – : आपल्या मेहनतीच्या बळावर यशाची शिखरे गाठत विटा नगरीची सुकन्या कुमारी जैनब तांबोळी हिने शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत तब्बल 99% गुण मिळवत उल्लेखनीय आणि घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विटा नगरपरिषद वतीने तिचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
जैनब तांबोळीच्या या यशामुळे संपूर्ण विटा शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास, आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून, तिची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठीही जैनबचा आदर्श मार्गदर्शक ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सत्कार प्रसंगी विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, शिक्षण सभापती डॉ. लीला भिंगारदेवे, अमर शितोळे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते जैनब तांबोळीचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे यांनी जैनबच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जैनब तांबोळी होय.” उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने अभ्यास आणि प्रगतीची दिशा कायम ठेवावी, असे मार्गदर्शन केले.
शिक्षण सभापती डॉ. लीला भिंगारदेवे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि समाज यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत जैनबच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, तिच्या यशातून प्रेरणा घेऊन शहरातील इतर विद्यार्थ्यांनीही उच्च ध्येय ठेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यामुळे जैनब तांबोळीच्या यशाला अधिकच उजाळा मिळाला असून, विटा नगरीत तिच्या कामगिरीचा गौरव केला जात आहे. पुढील शिक्षणातही ती असेच यश संपादन करून शहराचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.