महाराष्ट्रराजकीयसामाजिक

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ: राजर्षी शाहू महाराज

 

 

जातीव्यवस्थे विरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे. अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन त्यांच्या हॉटेलातील चहा आवडीने पिणाऱ्या या राजाची जयंती ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरी केली जाते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेऊन शाहू असे नाव ठेवले. फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उदारमतवादी शिक्षणाचे धडे धारवाड ला गिरविले आणि त्यानंतर भारतभर प्रवास केला. २ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले.

पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदोर च्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. या विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून २५ आंतरजातीय विवाह त्यांनी त्या काळी लावून दिले. आजही या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यास खून केला जातो, वाळीत टाकले जाते. शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत तर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक देखील आहेत. आजही जातीव्यवस्था टिकून असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्याव लागत आहे, ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली. मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली. विविध तत्कालीन परिस्थिती मध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती (उदा.पारधी समाज) चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होत्या. सनातनी व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेऊन त्यांना सत्ता आणि संपत्ती चा अधिकार नाकारला होता, त्यामुळे त्यांच्यावर नैराश्यातून अशी कृत्ये करण्याची वेळ आली होती. ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना गावकामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला. शाहू महाराजांनी ही हजेरी पद्धत रद्द केली आणि या जमातीतील लोकांना संस्थानात नौकऱ्या दिल्या. वणवण भटकणाऱ्या या लोकांना त्यांनी घरे बांधून दिली, त्यांच्या पोटा पाण्याची सोय करून दिली. त्यामुळे गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच.

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी महार वतने रद्द केली. शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचाराकडे वळाले. त्यांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली, गाव तिथे शाळा काढल्या. राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला, व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली.

१९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली, १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले, शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली, सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा. महात्मा फुले यांनी सुरु केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ शाहू महाराजांनी पुढे यशस्वी पणे चालू ठेवली. त्यांनी पुढे या चळवळीचा वारसा योग्य अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली, त्या व्यक्तीने पुढे देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले, ती व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १९१९ च्या सुमारास शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंड मधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी’ मिळाला आहे असे सांगितले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेर पर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

शाहू महाराजांनी जातीव्यवस्थे विरुद्ध लढा उभारून, शिक्षण प्रसार करून खूप मोठे काम केले .

*प्रा दिलीप आ. जाधव*
*सचिव*
*सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!