आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा ; डॉ. ओमप्रकाश शेटे

दर्पण न्यूज सांगली/मिरज : प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज केले.
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकत्रित आयुष्मान भारत योजनेतील सूचिबद्ध रूग्णालयांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यातील 4 हजार 180 रूग्णालयांना मान्यता दिली असून त्यापैकी 2 हजार 472 सूचिबद्ध रूग्णालयांतून उपचार दिले जाणार आहेत. तसेच 34 विशेष स्पेशालिटी उपचार पध्दती सुरू केलेली आहे. याबरोबरच कार्पोस निधीमधून 10 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचाही समावेश केला आहे. रूग्णालयांचे वर्गीकरणही आता बंद करण्यात आले आहे. रूग्णालयांना सुधारीत पॅकेजमध्ये पॅकेजव्यतिरीक्त NABH मानांकित रुग्णालयास 15 टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन रूग्णालये सूचिबद्ध करा असे सांगून डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, सामान्य रूग्णांच्या आरोग्याबाबत संवेदनशील राहावे. या माध्यमातून रूग्णांची सेवा करता येणार आहे. धर्मादाय रूग्णालये व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने लवकरच एक चॅटबोटच्या आधारावर स्वतंत्र ॲप विकसीत करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये संवाद साधून रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्या नजीकच्या सूचिबध्द रूग्णालयाची माहिती मिळवू शकणार आहेत. टोल फ्री क्रमांक 18002332200 या क्रमांकावर संपर्क साधूनही आवश्यक माहिती मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा घरेलु कामगार महिला यांच्या आरोग्य शिबिराचा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन करून डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, हा उपक्रम पथदर्शी असून तो राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रयत्न करू. सांगली जिल्ह्याशी आपला वेगेळा ऋणानुबंध आहे. सांगली जिल्ह्याने भरीव कामगिरी केल्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या हृदयशस्त्रक्रियेचा अनोखा उपक्रम आज संपूर्ण राज्यात सुरू आहे. आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असताना सांगली जिल्ह्याने केलेला सत्कार आपल्या सदैव स्मरणात असून, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात 91 रूग्णालये सूचिबध्द आहेत. या रूग्णालयांची संख्या वाढवावी अशी सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.
यावेळी दिनांक 9 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेल्या एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, आयुष्मान भारत कार्ड वितरण तसेच, सांगली जिल्हा घरेलु कामगार महिला यांच्या आरोग्य तपासणी मध्ये निदान झालेल्या रुग्णांचे आयुष्मान भारत योजनेमध्ये मोफत उपचार करण्यासह विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुंबे यांनी एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री आयुष्मान योजना यांचा आढावा सादर केला. यावेळी धर्मादाय व अन्य सूचिबद्ध रूग्णालयाच्या वतीने डॉ. अनिरूद्ध पाटील, डॉ. संजय पाटील व डॉ. विजया देवकुळे यांनी मनोगत व्यक्त केले.