महाराष्ट्रराजकीय

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

सांगली  : मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम आज दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. (१) अधिसूचना प्रसिध्दी – मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024, (२) नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख – मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024, (३) नामनिर्देशन पत्राची छाननी – बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024, (४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024, (५) मतदानाची तारीख – बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024, (६) मतमोजणीची तारीख – शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024, (७) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख – सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024.

सांगली जिल्ह्यात 281-मिरज (अनुसूचित जाती), 282-सांगली, 283-इस्लामपूर, 284-शिराळा 285-पलूस-कडेगाव, 286-खानापूर, 287-तासगाव-कवठेमहांकाळ व 288-जत असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण 25 लाख 22 हजार 509 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 76 हजार 791, स्त्री मतदार 12 लाख 45 हजार 570, तृतीयपंथी 148 मतदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2482 मतदान केंद्रे आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, निवडणूक प्रक्रियेची आणि आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती राजकीय पक्ष तसेच अधिकाऱ्यांनी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यादृष्टीने सर्वांनी दक्षता घेवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचे माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष व त्रयस्थ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्यासाठी मुक्त व पारदर्शी निवडणुका पार पाडण्याकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ व पुरेसा बंदोबस्त उपलब्ध आहे. जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करून निवडणूक मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडायची आहे. आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात पथकांची नियुक्ती आली आहे. सी व्हिजील ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करता येऊ शकेल, असे ते म्हणाले.

—————————————–

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे पार

पाडण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी  :                               जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

          सांगली: मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीच्या विविध कामांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची सखोल माहिती घ्यावी. त्याप्रमाणे नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे, असे ते म्हणाले.

या बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, साधनसामग्री व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक दरम्यान वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रशिक्षण, मीडिया प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, हेल्पलाईन व तक्रारींचे निरसन या विषयांबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रशासन सज्जतेचा आढावा घेण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!