महाराष्ट्र

दीक्षाभूमीवरील वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करा : डॉ. भीमराव आंबेडकर

डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 

नागपूर : दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्या संदर्भातील दस्ताऐवज आज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिले आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 14/10/1956 रोजी लाखो अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा दिली, त्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे. बौद्ध समाजामध्ये दीक्षाभूमीला अनन्यसाधारण महत्व असून, दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. सदर दीक्षाभूमी ‘ अ ‘ दर्जाचे स्मारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सदर दीक्षाभूमीवर, दीक्षाभूमी स्मारक समितीने भूमिगत वाहनतळ बांधकामासाठी अनधिकृतपणे संमती दिल्याचे निदर्शनास आलेले आहे. बौद्ध व आंबेडकरी जनतेमध्ये याबाबत तीव्र असंतोष आंबेडकरी समाज बांधव, विविध संघटनांच्या वतीने दीक्षाभूमी येथे अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाला विरोध करण्यासाठी दीक्षाभूमी बचाव आंदोलनही केले आहे. तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी विरोध केलेला आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी येत असतात. वरील पार्श्वभूमीवर या वर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनास प्रचंड जनसमुदायास उपस्थित राहणार आहेत. आता नुकतीच हाथरस ( उत्तर प्रदेश) येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये १२१ लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी हाथरस सारख्या अप्रिय घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील हे देखील निवेदनात नमूद केले आहे. तरी या बाबी लक्षात घेऊन दीक्षाभूमीवरील भूमीगत वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करून जमीन पूर्ववत करून द्यावी अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!