निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांचा आधार

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी दिनांक 01 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय रुग्णालय योजना अमलात आलेली आहे. धर्मादाय रूग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रूग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात राखून ठेवल्या जातात. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये 29 धर्मादाय रुग्णालये आहेत. जाणून घेऊया धर्मादाय रूग्णालयांतील सेवाविषयी….
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 व मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट याचिका पीआयएल क्र. 3232/2004 मधील अंतिम निर्णयानुसार दिनांक 01 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय रुग्णालय योजना अमलात आलेली आहे. या योजनेमध्ये समाविष्ट असणारी रुग्णालये ही सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली यांच्याकडील नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालये आहेत. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये 29 धर्मादाय रुग्णालये असून त्यामधून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना सेवा दिली जाते.
निर्धन घटक व दुर्बल घटक हे उत्पन्नाच्या मर्यादीवरून ठरवले जाते. त्यामध्ये ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत असेल अशा व्यक्तींचा समावेश निर्धन घटकामध्ये केला जातो तर ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार ते 3 लाख 60 हजार रुपयापर्यंत असेल अशा व्यक्तींचा समावेश दुर्बल घटकांमध्ये केला जातो. या दोन्ही घटकातील रुग्णांकरिता धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे एकूण कार्यान्वित असणाऱ्या खाटांच्या संख्येच्या दहा टक्के खाटा निर्धन घटकासाठी व दहा टक्के खाटा दुर्बल घटकासाठी आरक्षित व राखून ठेवणे बंधनकारक आहे.
निर्धन घटकातील रुग्णांच्या बाबतीत धर्मादाय रुग्णालयांनी प्रत्येक विभागातील वैद्यकीय तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत द्यावयाचे आहेत. त्यामध्ये खाटा, निवासी वैद्यकीय अधिकारी सेवा, सुश्रुषा, अन्न (रुग्णालय जर पुरवीत असेल तर ), कापड, पाणी, वीज, सर्वसाधारण विशेष उपचाराकरिता आवश्यक असलेल्या नित्य निदान विषयक सेवा, हाऊस कीपिंग सेवा या नमूद केलेल्या ना देयक सेवा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत देण्याचे आहे. निर्धन रुग्णाचे देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी असलेल्या दराने आकाराव्या लागतील. औषधे उपयोगात आणलेल्या वस्तू व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयांनी खरेदीच्या किमतीत लावावा व अशा प्रकारे तयार करण्यात आलेले देयक हे निर्धन रुग्णांच्या निधी खात्यातून खर्ची घातले जाते.
दुर्बल घटकातील रुग्णाचे बाबतीत धर्मादाय रुग्णालयांनी प्रत्येक विभागातील वैद्यकीय तपासणी व उपचार सवलतीच्या दराने द्यावयाचे आहेत. दुर्बल घटकातील रुग्णाचे देयकास ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे, अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गाच्या रुग्णांसाठी असलेल्या दराने आकाराव्या लागतील. औषधे उपयोगात आणलेल्या वस्तू व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयांनी खरेदीच्या किंमतीत लावावा. मात्र दुर्बल घटकातील रुग्णांना औषधे उपयोगात आणलेल्या वस्तू व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांच्या देयकांची निदान 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. अशा प्रकारे तयार करण्यात आलेले देयक हे दुर्बल घटकातील रुग्णांनी अदा केलेली रक्कम वजा करून निर्धन रुग्णांच्या निधी खात्यातून खर्ची घातली जाते.
धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन घटकातील रुग्णांना व दुर्बल घटकातील रुग्णांना दाखल करून घेताना कोणतीही अनामत रक्कम मागू नये.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे – मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार घेण्यासाठी रुग्णाने आधार कार्ड, रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी) आणि संबंधित तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला दाखल होताना देणे अपेक्षित आहे.
धर्मादाय रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक व आरोग्य मित्र यांच्याकडून रुग्णालयात दाखल होणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना अंतररुग्ण म्हणून दाखल केले जाते. अशा आंतररुग्ण म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचार हे जनरल वार्डमध्ये दाखल करून दिले जातात. यापैकी एखादा कागद सोबत नसेल तर उपचार थांबवले जाणार नाहीत, उपचार तातडीने सुरू करणे अपेक्षित आहे. सदरची कागदपत्रे ही रुग्णालय व्यवस्थापक यांच्याकडून मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय योजनेच्या वैद्यकीय कक्षाच्या वेबसाईटवर अपलोड केली जातात व तेथून मोफत किंवा सवलतीचे रुग्णसेवा देण्याबाबतची मान्यता दिली जाते.
या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली विभाग, सांगली मधील श्रीमती प्रियांगिनी बा. पाटील सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1, सांगली विभाग, सांगली यांच्या नियंत्रणाखाली रुग्णालय अधीक्षक प्रताप पवार व धर्मादाय निरीक्षक सचिन पाटील यांच्या स्वतंत्र रुग्ण सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली असून, तक्रारींचेही निवारणही या कक्षामार्फत केले जाते.
सांगली जिल्ह्यातील 29 धर्मादाय रुग्णालयांची नावे – 1) सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल सांगली रोड, मिरज. 2) वानलेस हॉस्पिटल गांधी चौक, मिरज, 3) गुलाबराव पाटील हॉस्पिटल गांधी चौक, मिरज, 4) स्वास्थियोग प्रतिष्ठान आर्थोपेडीक हॉस्पिटल मिरज, 5) आरोग्य केंद्र गुरुवार पेठ माधवनगर सांगली, 6) लायन्स नॅब आय हॉस्पिटल एम.आय.डी. सी. मिरज, 7) वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज सांगली, 8) लोकनेते राजाराम बापू पाटील हॉस्पिटल सांगली रोड इस्लामपूर, 9) मा. ना. आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक वैदक महाविद्यालय, आष्टा. 10) बन्ने हॉस्पिटल वाटेगांव, ता. वाळवा जि सांगली, 11) सोमशेखर हॉस्पिटल शिवाजी रोड, मिरज. 12) राजर्षी शाहू महाराज सर्वोपचार रुग्णालय, जत, 13) वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, बुधगांव ता. मिरज सांगली, 14) भारती हॉस्पिटल वानलेसवाडी, मिरज, 15) सोना हॉस्पिटल, सर्कीट हाऊसजवळ, सांगली, 16) कुल्लोळी गायनेकॉलॉजी अॅन्ड मॅटर्निटी, विश्रामबाग, सांगली, 17) श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल घनशामनगर, माधवनगर रोड, सांगली. 18) चोपडे मेमोरियल हॉस्पिटल, राममंदीरजवळ, सांगली, 19) कमल आर्थोपेडीक सेंटर सातारा रोड, जत, 20) उमा हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर. सांगली रोड जत, 21) डॉ. म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटल सांगली, 22) प्रकाश हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर सांगली रोउ इस्लामपूर, 23) माळवाडी भिलवडी हॉस्पिटल माळवाडी ता. पलूस, 24) लायन्स क्लब ट्रस्ट जयंत नेत्रालय, ताकारी रोड इस्लामपूर, 25) शिखरे ट्रस्ट जयंत नेत्रालय, ताकारी रोड, इस्लामपूर, 26) सौ. राधाबाई मॅटर्निटी हॉस्पिटल ट्रस्ट किर्लोस्करवाडी, 27) साईमल्टीस्पेशालिटी अॅन्ड अॅक्सीडेटल हॉस्पिटल, सावळज, ता. तासगांव, 28) नॅब आय नॅब आय हॉस्पिटल एम.आय.डी.सी. कुपवाड, 29) विवेकानंद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर बामणोली, ता. मिरज.
प्रियांगिनी पाटील
सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1 (रूग्णालय)
सांगली विभाग सांगली