भिलवडी पोलिसांकडून चार दिवसांत चोरीचा छडा ; एकाला ताब्यात ; मुद्देमाल जप्त
तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांची पत्रकार परिषदेत माहिती; भिलवडी पोलिसांचे कौतुक

दर्पण न्यूज भिलवडी : –
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून चार दिवसांत चोरीचा छडा लावला असून एकाला ताब्यात घेतले आहे तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
भिलवडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून, कुंदनसिंग रूपसिंग भौड असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या तीन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात भिलवडी पोलिसांना यश आले असून, नागठाणे येथे घडलेल्या चोरीचा अवघ्या चार दिवसांमध्ये छडा लावून भिलवडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशी माहिती तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी पत्रकार परिषद दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पलूस तालुक्यातील अंकलखोप ते नागठाणे मार्गावर एक व्यक्ती सुर्यगांव कमानीजवळ चार चाकी इको गाडी घेऊन, अंधारात संशयितरित्या थांबला असल्याची,खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तपासकामी गेले असता,एक व्यक्ती संशयितरित्या थांबल्याचे दिसून आले. त्यानंतर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस स्टाफ यांनी त्यास ताब्यात घेऊन, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुंदनसिंग रूपसिंग भौड वय वर्षे 23 राहणार वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या चार चाकी गाडीबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्यावर अधिक संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांनी लागलीच चार चाकी वाहनाच्या नंबरची खात्री केली असता, सदर वाहनाचा नंबर एम एच १० डी एल ९२४९ असा असून, त्याबाबत गुन्हे अभिलेख चेक केला असता सदरची गाडी चोरीच गेले बाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदरची गाडी ही वाळवा येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यात असलेल्या इको गाडीची तपासणी केली असता, त्याच्या गाडीमध्ये शिरोळ येथून चोरी केलेले कपडे व नागठाणे येथील चोरीतील बेंटेक्सचे दागिने व गाडीसह
एकूण सात लाख 539 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर,
तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक पाटील, अरविंद कोळी,महेश घस्ते, प्रवीण सुतार, राहुल जाधव, पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव, तोसिफ मुजावर, पोलीस शिपाई स्वप्निल शिंदे, सुनील शेख, रोहित माने, धीरज खुडे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील यांच्या पथकाने केली असून,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद कोळी हे करीत आहेत.