महाराष्ट्र

दिव्यांगांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे मोफत वितरण

 

         सांगली :- अभिजीत रांजणे : दिव्यांग व्यक्तिंना आधार देण्याची शासनाची भूमिका असून त्यादृष्टीने शासन काम करीत आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधने देवून त्यांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करीत असून शासन त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

दिव्यांगासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ADIP योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मिरज ग्रामीण भागातील व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तिंना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे मोफत वितरण आळतेकर हॉल दिंडी वेस मिरज येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, गट विकास अधिकारी डॉ. संध्या जगताप, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व एल्मिको संस्थेचे नोडल अधिकारी मृणाल कुमार व एस. के. रथ आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांना लाभ देण्याकरिता डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना कोणत्या साहित्याची गरज आहे याची नोंदणी करण्यात आली होती व आज त्यांना साहित्य वाटपाची सुरूवात करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

 एल्मिको संस्थेने दिव्यांगांच्यासाठी काम करण्यासाठी मदतीचा हात दिला याबद्दल संस्थेचे अभिनंदन करून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, एल्मिको संस्था 54 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल मोफत देत असून आणखी लागणाऱ्या 160 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल

जिल्हा नियोजन निधीतून घेत आहोत. अशा एकूण 214 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल आपण दिव्यांग बांधवांसाठी घेत असून यापैकी आज 15 प्राप्त झाल्या आहेत, उर्वरित टप्याटप्याने प्राप्त होतील. मिरज तालुक्यातील शहरी भागातील एकूण 237 व मिरज ग्रामीण भागातील 390 अशा एकूण 627 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येवून 1 हजार 164 साहित्याची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी मिरज शहर 231 व मिरज ग्रामीण मधील 362 अशा एकूण 593 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव मंजूर झाले आहेत. या माध्यमातून दिव्यांगांना आनंदमय जीवन जगण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, दिव्यांगांना 104 घरकुले मंजूर केली आहेत असे त्यांनी सांगितले.

खासदार संजय पाटील म्हणाले, दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक सहायभूत साधने मिळण्यासाठी प्रयत्नशील असून दिव्यांग बांधव आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने प्रगती करत आहेत. त्यांच्या या धैर्याला सलाम करून या कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले,  दिव्यांग बांधवांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासन, जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवांसाठी सदैव तत्पर आहे. त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास त्या सांगाव्यात त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारचे शिबीर प्रत्येक वर्षी सर्व तालुकास्तरावर किमान एकदा आयोजित करावे, जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, असे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी सायकल, हाताने चालविण्याची तीन चाकी सायकल, कानातील मशिन आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात गट विकास अधिकारी संध्या जगताप यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे यांनी मानले. या कार्यक्रमास दिव्यांग व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!