कुंडल वन प्रबोधिनीमध्ये विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा

दर्पण न्यूज सांगली : मॅरेथॉन, पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम, प्लॅस्टिक संकलन मोहीम व वृक्ष लागवड, अशा विविध उपक्रमांनी कुंडल वन प्रबोधिनीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात केली. या मॅरेथॉनमध्ये १४२ वनरक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. पुरुषांमध्ये धीरज गोटा यांनी प्रथम, समीर उसेंडी यांनी द्वितीय व राहुल हलामी यांनी तृतीय क्रमांक तर महिलांमध्ये कांचन कोटपरिया यांनी प्रथम, दुर्वा धारणे यांनी द्वितीय व अनिता गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅरेथॉनचे उत्कृष्ट आयोजन केले. या प्रसंगी सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस, कल्याणी यादव, निवृत सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, अर्जुन सोनवणे, दत्तात्रय शेटे, सुखदेव खोत व वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे उपस्थित होते.
या वर्षीच्या पर्यावरणदिनाची थीम ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे (Ending Plastic Pollution Globally) अशी असून या दिनाचे निमित्त साधून शासनाच्या सर्व विभागांमध्ये एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकार करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.
या दिनानिमित्त रजनीगंधा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असून पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतः पासून झाली पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस यांनी केले. तत्पूर्वी निवृत्त सहायक वनसंरक्षक सुखदेव खोत, दत्तात्रय शेटे, अर्जुन सोनवणे व रामदास पुजारी यांनी प्लास्टिक निर्मूलन, पर्यावरणपूरक जीवनशैली, वाढते तापमान, वनवनव्यांपासून वनांचे संरक्षण, पर्यावरणविषयक विविध बाबी तसेच वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, वनांचे, पर्यावरणाचे रक्षण आदि बाबींच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले.
रामदास पुजारी यांनी त्यांची ‘भस्मासूर प्लॅस्टिकचा ‘ ही कविता सादर केली. प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या सदाशिव गुद्दे, श्रुती मेश्राम, उत्तम उसेंडी, सोनू वाढई, शीतल उसेंडी, दिनेश गावडे, वैभव गावंडे, विजया मेश्राम, प्रगती बडगे, धनश्री किन्नके, मंगेश घोटेकर,मंदा गवई, कैलास मानुरे आदि वनरक्षक प्रशिक्षणार्थींनी त्यांचे पर्यावरणविषयक विचार भाषणातून, कवितांतून व्यक्त केले.
रामदास पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संचालक भरत शिंदे, सहयोगी प्राध्यापक रमेश लिधडे यांच्या नेतृत्वात प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली व विविध रोपांची लागवड करण्यात आली.