दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ कलावंतांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती प्रक्रियेचा फेरविचार करून शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा, तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेची आधीची निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पदोन्नती प्रक्रियेबाबत प्राप्त हरकतींची दखल घेण्यात आली. दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीत संधी मिळण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या मार्गदर्शनानंतर पुढील प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ कलावंतांच्या निवड प्रक्रियेबाबतही तक्रारींची दखल घेत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पात्र आणि गरजू कलावंतांना न्याय्य संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्गखोल्यांची दुरुस्ती, गळती, इमारतींची देखभाल आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशात्मक चर्चेतून स्पष्ट झाले. शिक्षकांची रिक्त पदे, गणवेश वाटप, पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळ आणि अन्य प्रशासकीय प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकीत भाडे वसूल करण्यासाठी संबंधित गाळेधारकांना नोटिसा बजावून वसुलीची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाला चालना मिळणार आहे. एकूणच, पारदर्शकता, पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत जिल्हा परिषदेच्या कारभाराला अधिक गतिमान करण्याचा स्पष्ट संदेश या सभेतून अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.
