दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
शेताच्या बांधापर्यंत जाणारा रस्ता हाच शेतकऱ्याचा खरा आधार; मात्र अतिक्रमणांमुळे याच पाणंद रस्त्यांचा श्वास गुदमरला आहे. वर्षानुवर्षे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून, यासाठी शेतकरी आमरण उपोषणाच्या पवित्र्यात उतरले आहेत.
महाराष्ट्र शेतकरी विकास आघाडीचे कृष्णात भगवान जाधव,,, पियुष पाटील यांच्यासह १६ शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले आहे. अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या शुद्धिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर शासनाच्या नियमानुसार अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, ‘आश्वासन नको, प्रत्यक्ष रस्ता खुला हवा’, अशीच शेतकऱ्यांची भूमिका असल्याचे चित्र आहे. कागदावरची कार्यवाही आणि प्रत्यक्ष शेतरस्त्यावरची कारवाई यामध्ये अंतर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रशासन अतिक्रमणांवर किती कठोरपणे हातोडा चालवते, यावर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
