
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) विलासराव देशमुख सेंटर, धाराशिव यांच्या वतीने ‘वक्ता धाराशिवचा, आवाज तरुणाईचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी दमदार कामगिरी करत प्रथम तीनही क्रमांक पटकावले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात गुरुवारी (ता. १३) झालेल्या अंतिम फेरीत सिद्धी राजकुमार कदम हिने प्रथम, सुप्रिया मुगळे हिने द्वितीय, तर प्रतीक्षा इंगळे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतील विजेत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभाग होता. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी आंदोलन आणि दडपशाही’, ‘युवक आणि भारतातील भविष्याची दिशा’ तसेच ‘वैज्ञानिक दृष्टिकोन : प्रगतीचा मार्ग’ या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मते मांडली.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी कदम हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला पाच हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोहार तालुक्यातील माकणी येथील बी. एस. एस. महाविद्यालयाची सुप्रिया मुगळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला तीन हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. कळंब तालुक्यातील रांजणी येथील साई महाविद्यालयाची प्रतीक्षा इंगळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला दोन हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर, विलासराव देशमुख सेंटरचे प्रमुख प्रशांत पाटील, सोमनाथ लांडगे, शशिकांत वैराळे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
परीक्षक म्हणून प्रा. राजा जगताप, प्रा. गायकवाड व प्रा. बोबडे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैभव आगळे यांनी केले, तर आभार अग्निवेश शिंदे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. साखरे, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, रविंद्र केसकर, सुनील बडूरकर आदींनी परिश्रम घेतले.
