– कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळी उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता
दर्पण न्यूज सांगली : कृष्णा-कोयना-वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, आज 1 ऑगस्ट दुपारी 2 वाजता आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी 26 फूट 2 इंच इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
कोयना धरणातून 33826, धोम 8219, कण्हेर 6072, उरमोडी 4962, तारळी 3596 व वारणा धरणातून 6900 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिनांक 31 जुलै 2026 रोजी मुक्त व धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळीमध्ये वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
