विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):– महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत २८६ खानापूर विधानसभा स्तरीय समाधान शिबिर आज (दि. ३० जुलै २०२६) विटा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. खानापूर व आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरास आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषद सभापती पृथ्वीराज पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे, विटा नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश चोथे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये खानापूर व आटपाडी तालुक्यातील एकूण १,५०० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. महसूल विभागामार्फत ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत ४२७ लाभार्थ्यांना सातबारा उतारे, १५६ लाभार्थ्यांना धान्य मागणी मंजुरी आदेश तसेच १०८ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी आदेश, तसेच लक्षीमुक्ती योजना, तुकडेबंदी नियमाकुल आदेश वितरित करण्यात आले.
पंचायत समितीमार्फत २४ महिला बचत गटांना एकूण ₹१ कोटी ८४ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. तसेच २२ घरकुल लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय महिला व बालविकास विभाग मार्फत स्तनदा मातांना बेबी केअर किट, तसेच मातृवंदना योजना लाभ प्रदान करण्यात आले.
नगरपरिषदेमार्फत आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. कृषी विभागामार्फत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. वन विभागाने ५ नुकसान भरपाई आदेशांचे वितरण केले. परिवहन विभागाने शिबिरस्थळीच १२५ लाभार्थ्यांना राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (NCMC) उपलब्ध करून दिले. महावितरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.
यावेळी आमदार सुहास बाबर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रशासन प्रभावी व लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, अशा प्रकारचे समाधान शिबिर ग्रामपंचायत स्तरापर्यंत आयोजित करून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विविध शासकीय विभागांच्या सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम व खर्चाची मोठी बचत होत असून अशा उपक्रमांमुळे शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
सदर शिबिराचे नियोजन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश टोंपे, आटपाडी तहसीलदार शीतल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महसूल, पंचायत समिती , कृषी, वन, परिवहन, नगरपरिषद , महावितरण , बचत गट, टपाल विभाग, भूमी अभिलेख तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तात्काळ सेवा व लाभ उपलब्ध करून दिले.
