दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)- :
दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी विटा नगरपरिषदेच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी ४५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे यांनी केले.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा सौ.काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, महिला व बालकल्याण सभापती सौ.अपर्णाताई रणजित पाटील, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. शिलाताई अशोक लिपारे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा नगरपरिषदेकडून विविध सामाजिक व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नगर विकास विभागाच्या २८ ऑक्टोबर २०१५ आणि १० मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण निधीपैकी किमान पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. या तरतुदीनुसार विटा नगरपरिषदेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी विटा नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत, रहिवासी पुरावा तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून शासनाच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.याबाबत अधिक माहिती साठी विभागप्रमुख नेहा खडके यांच्याशी संपर्क साधावा
पात्र लाभार्थ्यांना मंजूर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अचूकपणे सादर करावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. “दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. नगरपरिषद हद्दीतील एकही पात्र दिव्यांग लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा,”असे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी सांगितले
दिव्यांग बांधव-भगिनींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विटा नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
