दर्पण न्यूज मिरज / सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन (12 ऑगस्ट) व युवा पंधरवडा निमित्त युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली यांच्या वतीने आज आयोजित रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 13 रेड रिबन क्लब कार्यान्वित असलेल्या महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली यांनी सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने केले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण 97 स्पर्धकांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन विश्रामबाग चौक, सांगली मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, मा. डॉ. पतंगराव कदम चौक मार्गे सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे मॅरेथॉनची सांगता झाली.
स्पर्धेनंतर विजेत्यांना जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनचे गणेश सिंहासने, संजय पाटील, पी. बी. चव्हाण यांच्याहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांनी केले. यावेळी पी. बी. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेसाठी आदर्श कॉलेज, विटा, आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर, मा. आर. आर. पाटील कॉलेज, सावळज, म्हैसाळ कॉलेज, म्हैसाळ, डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज, कस्तुरबा वालचंद कॉलेज, सांगली, एन. डी. पाटील नाईट कॉलेज, जी. ए. कॉलेज, बिरनाळे कॉलेज तसेच डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगलीवाडी येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, आयसीटीसी, गुप्तरोग विभाग, एआरटी केंद्रातील कर्मचारी तसेच आधार वेल्फेअर सोसायटी, संग्राम संस्था, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान (बामणोली) आणि विहान, सांगली-मिरज या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
मुले : प्रथम – ऋषिकेश गजानन पवार (एन. डी. पाटील नाईट कॉलेज, सांगली), द्वितीय – समर्थ सतीश दुधाळ (डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगलीवाडी), तृतीय – समर्थ संदीप येडकर (एन. डी. पाटील नाईट कॉलेज, सांगली).
मुली : प्रथम – सुमित्रा रावसाहेब खंडागळे (कस्तुरबा वालचंद कॉलेज, सांगली), द्वितीय – खुशी अप्पासाहेब म्हारूगडे (डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगलीवाडी), तृतीय – स्नेहल उमेश हिंगमिरे (डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगलीवाडी).
स्पर्धेतील मुले व मुली गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांची राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
