

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा मायणी रोडवरील आदर्श कुस्ती केंद्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदर्श कुस्ती केंद्राचे वस्ताद अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मल्ल यांनी गुरु पौर्णिमा साजरी केली. पौर्णिमेचे औचित्य साधून आज कुस्ती केंद्र येथे ज्या मातीमध्ये भविष्य घडलं मल्ल घडला तिथे सर्व मल्ल यांनी एकत्रित येऊन याच मातीत शिवशंभो महादेवाची पिंड तयार करून त्याचे पूजन केले. तसेच कुस्ती केंद्रातील साहित्यांचे पूजन करून, आपली परंपरा पार पाडली. गुरु म्हणून खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे माजी आमदार ॲड श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, या वेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा सर्व मल्लांनी , बालगोपालांनी आदर्श कुस्ती केंद्राचे वस्ताद अभिजीत मोरे (पैलवान) यांच्या सह सर्वांनी एकत्र येऊन सत्कार केला.
यावेळी आमचे गुरु म्हणून सदैव भाऊ पाठीशी राहिले तसेच आमचे वस्ताद अभिजीत मोरे सर यांनीही सदैव आम्हाला घडवण्यासाठी परिश्रम घेतला. आई वडील यांचा आदर्श काय आहे या विषयावर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी विचारधारा मांडत, धरणीमाता हीच आपली आई आणि हेच गुरु म्हणून आपण नक्कीच घडाल, असा विश्वास संपादन करा. या कुस्ती केंद्रातील सर्व लहान मोठे मल्ल यांनी भाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन आपली विचारधारा जपली. या वेळी आदर्श कुस्ती केंद्राचे वस्ताद अभिजीत मोरे सर, आदित्य गुजले पैलवान, रोहन निकम, विशाल मदने पैलवान, जीत गायकवाड, गणेश जगदाळे, पैलवान, तसेच लहान मल्ल आणि त्यांचे वस्ताद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष युवा नेते ॲड श्री वैभव दादा पाटील यांनीही आदर्श कुस्ती केंद्रास भेट देऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व लहान मोठे मल्ल तसेच वस्ताद अभिजीत मोरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वैभव दादांना शुभेच्छा देत सर्व मल्ल एकत्र येऊन त्यांनी वैभव पाटील दादांचा सत्कार केला.
