दर्पण न्यूज मिरज / सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या नव्या प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरून शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महाडीबीटी 2.0 पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता तसेच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी (PPP) योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अशा विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक असून आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करावी लागणार आहे. मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्डचा वापर करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते, पत्ता व इतर माहिती अद्ययावत ठेवावी. शिष्यवृत्तीची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्जामध्ये अचूक माहिती भरावी.
विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका आदि आवश्यक कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत. नवीन तसेच नूतनीकरण (Renewal) अर्जदारांनी नवीन महाआयडीद्वारे लॉगिन करून अर्ज भरावा. नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी “माझा अर्ज नूतनीकरण करावा” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे.
महाविद्यालयांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क किंवा परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये. महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची, शुल्क रचनेची व इतर आवश्यक माहिती महाडीबीटी 2.0 पोर्टलवर अद्ययावत करावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहणार आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. लॉगिननंतर पात्र योजनेची निवड करून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाईन सादर करावा. अर्जाची प्रत प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवावी.
अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८००/१८००१०२५३११ अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणींसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
