
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-सांगली : अनुसूचित जाती (अ, ब, क, ड) वर्गीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सामाजिक न्याय आणि संविधानाने दिलेल्या समान संधीच्या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या विषयावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष तुषार ठोंबरे यांनी केली आहे.
डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांनी १७ जून ते २४ जून या कालावधीत पुणे ते मुंबई आझाद मैदान असा संविधानिक व लोकशाही मार्गाने पदयात्रा व आंदोलन करून अनुसूचित जाती (अ, ब, क, ड) वर्गीकरणाचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणला. त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे, जनजागृती, बैठका आणि समाजसंवादाच्या माध्यमातून समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
अनुसूचित जाती (अ, ब, क, ड) वर्गीकरणाच्या मागणीला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत असून, शासनाने या जनभावनेची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा. सामाजिक न्यायाचा प्रश्न हा संविधानिक अधिकाराचा विषय असून, त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.
तसेच, समाजमाध्यमांवर सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींविषयी कायद्याचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होत असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. यासोबतच, सचिन भाऊ साठे यांच्या सुरक्षेचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन लागू निकषांनुसार आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.
महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अमूल्य योगदान देणारे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” मरणोत्तर प्रदान करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे ठोस शिफारस करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मुख्य मागण्या
– अनुसूचित जाती (अ, ब, क, ड) वर्गीकरणाचा निर्णय तातडीने जाहीर करावा.
– समाजाच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने सकारात्मक व ठोस भूमिका घ्यावी.
– लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी.
– सचिन भाऊ साठे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन लागू निकषांनुसार आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.
– समाजमाध्यमांवर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आक्षेपार्ह कृत्यांवर कठोर कारवाई करावी.
“सामाजिक न्याय हा कोणत्याही समाजाविरुद्धचा संघर्ष नसून, संविधानाने दिलेल्या समान हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीचा विषय आहे. शासनाने समाजाच्या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने मांडलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा,” असे आवाहन तुषार ठोंबरे यांनी केले.
– तुषार ठोंबरे
पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष
डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना
