

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव, दि. २८ जुलै : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे आणि सामाजिक न्यायाच्या विरोधातील कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, या ठाम भूमिकेसह आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने धाराशिव येथे ऐतिहासिक जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून लाखोच्या संख्येने भीमसैनिक, संविधानप्रेमी नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अनुसूचित जातीतील ५९ जातींचे प्रतिनिधी या महामोर्चात सहभागी झाल्याने संपूर्ण धाराशिव शहर निळ्या झेंड्यांनी नटले आणि अक्षरशः निळामय झाले.
महामोर्चापूर्वी आयोजित जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक मा. आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघटित, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारण्याचे आवाहन केले. संविधानिक हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत सर्व समाजघटकांनी एकजूट कायम ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या सभेला समितीचे प्रमुख पदाधिकारी राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय (नाना) शिंगाडे, कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, नितीन शेरखाने,ॲड.भैय्यासाहेब साबणे, विद्यानंद बनसोडे, राजाभाऊ राऊत, कुंदन वाघमारे,विकास बनसोडे, भालचंद्र कठारे, बाळासाहेब माने, सुनील वाघमारे, शांतिनाथ शेरखाने, प्रा. अशोक पापडे, अशोक बनसोडे, अरुण बनसोडे, सुनील (आप्पा) बनसोडे, आनंद भालेराव,ॲड.अरुणा गवई, डी. जी. हौसलमल, सतपाल बनसोडे, आनंद पांडागळे, स्वप्निल शिंगाडे सिद्धार्थ बनसोडे,प्रवीण शिरसाटे, सोमनाथ गायकवाड,यशपाल गायकवाड,पृथ्वीराज वाघमारे,यांच्यासह जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर जिजाऊ चौक येथून महामोर्चास प्रारंभ झाला. छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगे महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. “जय भीम”, “जय संविधान”, “आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा”, “संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण धाराशिव शहर दणाणून गेले.
महामोर्चानंतर जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करणे, बदर समिती त्वरित बरखास्त करणे, जातीनिहाय जनगणना करणे, महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा करणे, बाटये महामंडळाचे संचालक सुनील वारे यांना पदावरून हटवून सक्षम प्रशासकाची नियुक्ती करणे, रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांना ₹१० लाखांपर्यंत अनुदान देणे, खाजगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करून कायमस्वरूपी रोजगाराला प्राधान्य देणे, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागांकडे वळविणे तात्काळ थांबविणे तसेच महात्मा फुले महामंडळाच्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या ऐतिहासिक महामोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले. मोर्चाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनतेची अभेद्य एकजूट आणि संघर्षाची तयारी दर्शविणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांनी “संविधान वाचवायचे असेल तर आरक्षण वाचवावे लागेल आणि आरक्षण वाचवायचे असेल तर उपवर्गीकरणाचा कट हाणून पाडावा लागेल,” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला. संविधान, सामाजिक न्याय, समता आणि आरक्षणाच्या रक्षणासाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.
