
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सुहास भैय्या बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या जन आरोग्य समितीची पहिली सभा मंगळवारी (ता. २१) विटा नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक संजय भिंगारदेवे होते. सभेच्या प्रारंभी समितीतील सर्व सदस्यांचा सत्कार मेडिकल ऑफिसर डॉ. तबसूम मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष संजय भिंगारदेवे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ गरजू नागरिकांना मिळवून देणे हा जन आरोग्य समितीचा प्रमुख उद्देश आहे. विटा शहरातील सर्व गरजू नागरिकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा. विटा नगरपरिषद हद्दीत जन आरोग्य अभियानांतर्गत पाच ठिकाणी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शासनाच्या माध्यमातून औषधे व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी या केंद्रांवर जाऊन मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा.”असे आवाहन नगरसेवक संजय भिंगारदेवे यांनी केले.
आमदार सुहास भैय्या बाबर व उपनगराध्यक्ष अमोल दादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, शहरातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत आरोग्यविषयक शासकीय योजना व सुविधा पोहोचविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यात येईल, असेही भिंगारदेवे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, पाणीपुरवठा सभापती सुरेश पवार, शिक्षण सभापती लीलाताई भिंगारदेवे, नगरसेविका रुपाली पाटील,बालकल्याण सभापती अपर्णा पाटील, नगरसेविका रसिका सपकाळ, नगरसेविका शिला लिपारे, नगरसेविका दीपा चोथे, नगरसेविका भाग्यश्री तारळेकर, नगरसेवक अविनाश शितोळे, स्वयंसेविका मयुरी भिंगारदेवे, अंजली भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भिंगारदेवे, आरोग्य अधिकारी संजय जाधव, अमितसिंग परदेशी, विशाल भिंगारदेवे, टीबी सुपरवायझर शरद कुंभार, मेडिकल ऑफिसर डॉ. तबसूम मुजावर, भाग्यश्री खाडे, रणजीत पाटील, एजाज मुलाणी, मकरंद गायकवाड यांच्यासह जन आरोग्य समितीचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
