दर्पण न्यूज पलूस, प्रतिनिधी (अभिजीत रांजणे)-: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भाजपा , राष्ट्रवादी, शिवसेना तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, “२२ जुलै हा दिवस पूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छांनी उजळून निघायचा. कार्यकर्त्यांच्या गर्दीने त्यांचे निवासस्थान फुलून जायचे. आज तोच दिवस स्मृतींचा, कृतज्ञतेचा आणि अश्रुपूर्ण अभिवादनाचा दिवस बनला आहे. हा दिवस केवळ जयंतीचा नाही, तर महाराष्ट्रासाठी आयुष्यभर झटलेल्या एका कर्मयोग्याला, विकासपुरुषाला आणि लाखो कार्यकर्त्यांच्या आधारवडाला वंदन करण्याचा दिवस आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यालाही दादांनी मोठे बळ दिले.
“आज मागे वळून पाहताना जाणवते की दादांनी आम्हाला केवळ राजकारण शिकवले नाही, तर समाजकारणाचे खरे तत्त्वज्ञान दिले. राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजाच्या वेदना कमी करण्यासाठी असते, हा त्यांचा विचार आमच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते सर्जेराव अण्णा नलावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ” सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित देऊन शहराचा विकास केला तरच ते अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. ” यावेळी काँग्रेस नेते सुहास पुदाले, यांनी बोलताना म्हणाले, “अजित दादांसारखा नेता होणे नाही अजितदादा हे खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते”. यावेळी बोलताना उबाटा शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक गोंदील म्हणाले की, ” अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार असताना आणि कोविडमध्ये दादांनी राज्याचे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे काम केलेल आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दादांनी या जिल्ह्यातल्या या राज्यातील अनेक लोकांना जीवनदान दिलेला आहे.”
जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. मोराळ येथील जिल्हा परिषद शाळेत स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रभात फेरी काढून पर्यावरण जनजागृती केली.
त्यानंतर बांबवडे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच हायस्कूलमध्ये प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.
रामानंदनगर येथे अल्प संख्यांक मेळावा घेण्यात आला.
पलूस येथील मुख्य अभिवादन कार्यक्रमास रामानंद पाटील, उमेश पाटील, हनुमंत मोहिते, नगरसेवक अमृत माळी, प्रकाशराव पुदाले, चंद्रकांत मोरे, मा. संजय गोंदील, संजय येसुगडे, मिलिंद पाटील, सुभाष सुतार, जयदीप पाटील, महेश सुतार, राजाराम कांबळे यांच्यासह पत्रकार तुकाराम धायगुडे, शशिकांत रेपाळ, पंकज गाडे, शशिकांत राजवंत, जमीर सनदी, वैभव माळी, संजय शिंदे, अभिजीत कौलगे, शुभम निकम, तुषार सूर्यवंशी, सागर कदम, भास्कर संकपाळ, रणजीत शिंदे, अमीर पठाण, विकी तातुगडे, अभिजीत कदम, आदित्य धनवडे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमांमधून त्यांच्या विकासाभिमुख विचारांना व समाजसेवेच्या कार्याला उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले.

