दर्पण न्यूज मिरज / सांगली : सन 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून आपदा मित्रांचे विशेष पथक मदत व बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले होते. या पथकाने पूरबाधित भागात जीवाची पर्वा न करता शोध व बचाव मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावत अनेक बाधित व्यक्तींचा शोध घेणे, त्यांची सुरक्षित सुटका करणे तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध कामांमध्ये प्रभावी योगदान दिले होते. या उल्लेखनीय व धाडसी कार्याची दखल घेत आपदा मित्रांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ उपस्थित होते.
भविष्यातही आपत्तीच्या काळात शोध व बचाव कार्यात अधिक जोमाने सहभागी होण्यासाठी तसेच स्वयंसेवकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपदा मित्रांच्या कार्याचे कौतुक करत, आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदतीला धावून जाणारे स्वयंसेवक हे समाजासाठी मोठी ताकद असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आपदा मित्रांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून, त्यांची सेवा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांनीही आपदा मित्रांच्या धाडसी कार्याचे कौतुक करून भविष्यात अधिक सक्षम आपत्ती प्रतिसाद यंत्रणा उभारण्यासाठी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
