दर्पण न्यूज भिलवडी पलूस : प्रतिनिधी
“शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना दमदाटी करून, जबरदस्तीने महावितरणचे अधिकारी व कर्मचारी स्मार्ट मिटर बसवत आहेत. स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा, भरमसाठ वीज बिले येत असून, महावितरण स्मार्ट मिटरच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांवर करत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही.” असा इशारा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानसभेत दिला.
पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणारी अरेरावी आणि त्यानंतर येणाऱ्या अवाच्या सव्वा वीज बिलांचा मुद्दा जोरदारपणे मांडला. “नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत अन्यायकारक वीज बिल वाढ खपवून घेणार नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आमदार डॉ. कदम म्हणाले, “संपूर्ण राज्यात स्मार्ट मीटर बसवताना अधिकाऱ्यांची दादागिरी सुरू आहे. घरात पुरुष नसताना, महिला आणि लहान मुले एकटे असताना जबरदस्तीने घुसून मीटर बसवले जात आहेत. नागरिकांना विश्वासात न घेता, दमदाटी करून ही प्रक्रिया राबवली जात आहे. ही अरेरावी तात्काळ थांबवली पाहिजे.”
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात झालेल्या प्रचंड वाढीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला. “ज्या शेतकऱ्याचे, सर्वसामान्य नागरिकाचे बिल महिन्याला १० ते १५ हजार रुपये येते, त्याला अचानक ६० ते ७० हजाराचे बिल पाठवले जात आहे. याला कोणताही तर्क नाही. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड आहे की जाणीवपूर्वक बिल वाढवले जात आहे, हे सरकारने स्पष्ट करावे” अशी मागणी त्यांनी केली.
“हा गोरगरिबांवर, शेतकऱ्यांवर आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय आहे. आधीच महागाईने नागरिक त्रस्त आहेत. अशात वीज बिलाच्या नावाने त्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे. सभागृहात अनेक सदस्यांनी स्मार्ट मिटरचा मुद्दा मांडला. मात्र, फक्त कागदोपत्री उत्तरे देऊन उपयोग नाही. तर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, शेतकरी व ग्राहकांवर सुरू असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही.” असा इशारा आमदार डॉ. कदम यांनी दिला.