
डॉ. प्रताप (नाना) पाटील,प्रदीप (आप्पा) कदम यांच्या
उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अंकलखोप येथे आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याला परिसरातील विविध गावांतील युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत राष्ट्रवादी काँग्रेसप्रती आपला विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाभिमुख भूमिका, जनसामान्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. कुलदीप वारे यांनी प्रास्ताविक केले .सूत्रसंचालन शिवाजी रावळ यांनी केले, तर अभिजीत सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.
या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जाहीर पक्षप्रवेश सोहळा ठरला. भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, नागठाणे, अंकलखोप, धनगाव आणि भिलवडी स्टेशन परिसरातील युवकांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ दिले.
यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. पक्षाचा स्कार्फ, विचारधारा आणि विकासाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची ग्वाही नव्या कार्यकर्त्यांनी दिली.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस व भाजप पक्षाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद या भागात अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाला विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला