दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी : -पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील नदीपात्रातून वाहून जाणारे पावसाचे पाणी सिंचन योजनांसाठी वापरण्यात यावे, अशी मागणी माजी राज्य मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार डॉ. कदम यांनी म्हंटले आहे की, पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने तलाव, विहिरी आणि ताकारी, टेंभू जल सिंचन योजनांमधील पाणीसाठा घटला असून, बागायत पीके धोक्यात आली आहेत. तर खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
पावसाळ्यात नदीपात्रातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी टाकारी व टेंभू सिंचन योजनांसाठी वळविल्यास सिंचनाखालील क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल. बागायत पिकांना जीवदान मिळेल. तसेच तलावांमध्ये पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागू शकतो.
कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर, हिंगणगाव बुद्रुक, कडेगाव, शाळगाव, कारंदेवाडी आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचेही आमदार डॉ. कदम यांनी पत्राद्वारे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित विभागांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना द्याव्यात, टाकारी व टेंभू सिंचन योजना सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.