
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- ६ जुलै २०२६ : धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आज, दि. ०६ जुलै २०२६ रोजी झालेल्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, धाराशिव यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दि. २७ जुलै २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर एस.सी. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संविधान बचाव मोर्चा काढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे अनुसूचित जातींना बहाल केलेले आरक्षण हे सामाजिक न्याय, समता आणि समान संधीचे घटनात्मक संरक्षण असल्याचे अधोरेखित करण्यात आले. एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आणि त्याविरोधात संविधानिक व लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीमध्ये मोर्चाचे नियोजन, जनजागृती मोहीम, गावागावांत संपर्क अभियान, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच सर्व समाजघटकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, धाराशिव यांच्या वतीने अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे प्रतिनिधी, आंबेडकरवादी संघटना, भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी दि. २७ जुलै २०२६ रोजी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
“आरक्षण वाचवा – संविधान वाचवा!”
“जय भीम! जय संविधान! जय भारत!”