– चार वर्षांत १३,०७७ रुग्णांवर उपचार;
– एचआयव्ही बाधितांसाठी स्वतंत्र यंत्राची सुविधा
दर्पण न्यूज सांगली : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हिमोडायलिसिस सेवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ग्रामीण व सीमाभागातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल १३,०७७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून, त्यामध्ये ७३९ एचआयव्ही बाधित रुग्णांचाही समावेश आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस यंत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबत अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या चार डायलिसिस मशीनपैकी एक यंत्र एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात एकूण सहा डायलिसिस यंत्रांद्वारे नियमित सेवा दिली जात असून, तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट, प्रशिक्षित फिजिशियन्स आणि डायलिसिस तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जात असल्याने रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्यसेवा मिळत आहे.
तीव्र व दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, एंड-स्टेज रेनल डिसीज, युरिमिया, विषबाधा, शरीरात अतिरिक्त पाणी साचणे, क्षारांचे असंतुलन तसेच प्लाझ्मा फेरेसिस आवश्यक असलेल्या रुग्णांवर येथे हिमोडायलिसिस उपचार केले जातात. रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि कॉम्पोनंट ब्लड बँकची सुविधा उपलब्ध असल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळत आहेत.
खाजगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसिससाठी हजारो रुपयांचा खर्च येत असताना, मिरज शासकीय रुग्णालयात ही सेवा केवळ २३० रुपयांत उपलब्ध आहे. तसेच पिवळे रेशनकार्डधारक, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांतील पात्र लाभार्थ्यांना ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेशकुमार शिंदे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संयुक्त संकल्पनेतून लवकरच मिरज शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक व सुसज्ज डायलिसिस उपचार केंद्र उभारण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांना आणखी सक्षम व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मिरजसह जत, आटपाडी, सांगोला, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटक सीमाभागातील मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी हे केंद्र जीवनदायी ठरत असून, वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहे.